फणसोपच्या भूमीत दरवळला देव-घैसास-कीर महाविद्यालयाच्या 'राष्ट्रीय सेवा योजने' च्या श्रमाचा सुगंध; सात दिवसीय निवासी शिबिराची सांगता:
"नॉट मी, बट यू" (मी नव्हे, तुम्ही) हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून, समाजसेवेचा ध्यास घेतलेल्या भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या 'राष्ट्रीय सेवा योजना' (NSS) विभागाच्या सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराची सांगता ३१ डिसेंबर २०२५ रोजी फणसोप ग्राममध्ये उत्साहात संपन्न झाली. गेल्या सात दिवसांपासून फणसोप गावात या शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी विविध सामाजिक कामे केली. वर्षाचा शेवटचा दिवस हा केवळ सरत्या वर्षाला निरोप देण्याचा नसून, नव्या सामाजिक जाणिवांच्या सुरुवातीचा आहे, असा संदेश या सांगता समारंभातून देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी व्यासपीठावर फणसोप गावच्या सरपंच सौ. राधिका साळवी, जि. प. केंद्रीय शाळा फणसोपचे मुख्याध्यापक श्री. वसंत विश्वासराव, ग्रामसेवक श्री. सदानंद शिंदे, भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष श्री. श्रीराम भावे, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ.वसुंधरा जाधव, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी सहा प्रा. मिथिला वाडेकर, सहाय्यक प्रकल्पाधिकारी सहा प्रा. ऋतुजा भोवड व सहा. प्रा. विनय कलमकर उपस्थित होते.